Ganpatrao deshmukh biography of alberta
अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास जाणून घ्या ग्रेट गणपतरावांचा जीवनप्रवास
Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Jul , am
Subscribe
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.
हायलाइट्स:
- ५० वर्षाहून अधिक काळ लोकप्रतिनिधी म्हणून पाहिलं काम
- साधी राहणी आणि तत्वांवर निष्ठा असणारा राजकारणी
- गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राज्यभरात हळहळ
Ganpatrao Deshmukh: गणपतरावांचं जाणं क्लेशदायक; पवारांनी 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली
असा होता राजकीय प्रवास
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही देशमुख यांचं कौतुक केलं होतं.
पुण्यात विद्यार्थी दशेत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापचे मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले. निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. ५० वर्षाहून अधिक काळ त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलं. या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला.
शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणारा शेकाप कधीही सत्तेत येऊ शकत होता. शंकरराव मोरे, नाना पाटील, सी. डी . देशमुख, केशवराव जेधे, माधवराव बागल, तुळशीदास जाधव अशा दिग्गजांनी उभा केलेला शेकाप हा पक्ष. कधीकाळी नगरसारखा संपूर्ण जिल्हा शेकापच्या लाल रंगाने व्यापला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर सर्वात महत्वाचा शेकाप हा पक्ष होता. पण त्यानंतरच्या काळात पक्षाची उतरण सुरु झाली. हळूहळू पक्षाचं अस्तित्व मर्यादित झालं. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यामुळे रायगड आणि गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोल्यात शेकापचे अस्तित्व राहिले. त्यातही १९६२ नंतर महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीमध्ये गणपतराव देशमुख पक्षासोबत प्रामाणिकपणे व निष्ठेने राहिले.
कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही गणपतरावांचा सक्रिय सहभाग होता. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. गणपत आबा दोनवेळा मंत्री झाले होते. मंत्रिपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला. आमदार म्हणून ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.
गणपतरावांचा जन्म १९२७ साली झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. मात्र १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख दोन अपवाद सोडले तर ते निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. अगदी मोदी लाटेतसुद्धा ते निवडून आले. पाय जमिनीवर असण्याची कला व साधेपणा या कारणामुळे लोकांनी त्यांना सातत्याने भरघोस मतांनी निवडून दिले.
दरम्यान, विरोधी पक्षात राहूनदेखील कामे होऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून विकास साधला. त्यासोबतच पाण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. मुंबईत असताना सरकारी पातळीवर काम करून घेणं आणि लोकांसोबत आंदोलनात उभं राहणं या दोन्ही ठिकाणी लोकांनी गणपत आबांना कायमच पाहिलेलं आहे. देशमुख यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.